Delhi Weather Update: आज राजधानी दिल्लीसह देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडत आहे. पावसामुळे काहींना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, तर काहींसाठी पाऊस संकट घेऊन आलाय. पावसामुळे नवी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.
नेमकं काय झालं?मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत 2 महिला आणि 3 मुले होत्या. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातही पाणी साचले होते. पाण्यापासून वाचण्यासाठी महिलेने विजेचा खांब पकडला, त्यामुळे महिलेला जोराचा धक्का बसला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलसाक्षीच्या मृत्यूमुळे तिची दोन मुले अनाथ झाली आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अपघाताला रेल्वे जबाबदार असल्याचा साक्षीच्या वडिलांचा आरोप आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की नवी दिल्ली स्टेशन परिसरात आणखी काही ठिकाणे आहेत, जिथे अशा घटनेचा धोका मोठा आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.