नवी दिल्ली : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दिल्लीत (Delhi संसर्गाचा वेग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानीत झपाट्याने वाढणाऱ्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज झालेल्या दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या (DDMA) बैठकीत दिल्लीत पुन्हा एकदा वीकेंड कर्फ्यू (Weekend Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर, खासगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, दिल्लीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. या बैठकीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत लवकरच अधिकृत आदेश व अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
दिल्लीतील कोरोनाच्या चिंताजनक स्थितीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. सिसोदिया म्हणाले की, दिल्लीसह संपूर्ण देशात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, ओमायक्रॉन जास्त नुकसान करत नाही. दिल्लीत सुद्धा सध्या तोच ट्रेंड दिसून येत आहे, जो संपूर्ण जगात सध्या आहे. दिल्लीतील रुग्णालयात 350 लोक दाखल आहेत. ज्यामध्ये 124 ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. 7 जण व्हेंटिलेटरवर आहेत. याचबरोबर, आपण सर्वांनी कोरोनापासून कोणत्याही परिस्थितीत लांब राहणे आवश्यक आहे. आजच्या डीडीएमएच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती जास्तीत जास्त लोकांना समजली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले.
डीडीएमएचा निर्णय...- दिल्लीत शनिवार आणि रविवारी कर्फ्यू असेल.- दिल्लीतील सरकारी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम राहील.- अत्यावश्यक सेवांची कार्यालये सुरू राहतील.- खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालतील. उर्वरित वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन काम करतील.
एम्सच्या सुट्ट्या रद्द..कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता दिल्ली एम्सने हिवाळी सुट्ट्या म्हणजेच उर्वरित सुट्ट्या (5 ते 10 जानेवारीपर्यंत) रद्द केल्या आहेत. एम्सने रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर ड्युटीवर परतण्यास सांगितले आहे. दरम्यान, दिल्लाती आता पॉझिटिव्हिटी रेट 6.46 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, यादरम्यान 1509 रुग्ण बरेही झाले आहेत.
दिल्लीत संसर्गाचे प्रमाण 6.46 टक्क्यांवर दरम्यान, कोरोना व्हायरसची तिसरी लाट आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) पार्श्वभूमीवर देशात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. दिल्लीत सोमवारी कोरोना कोरोना संसर्गाची 4,099 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, जी रविवारच्या तुलनेत 28 टक्के अधिक आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर संसर्गाचे प्रमाण 6.46 टक्क्यांवर पोहोचले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोना पॉझिटिव्ह!दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबद्दल ट्विटद्वारे माहिती दिली आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात राहावे आणि स्वतःची चाचणी करून घ्यावी", असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.