नवी दिल्ली - झारखंडपाठोपाठ आता राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीआधीच भाजप अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपच सरकार स्थापन करणार असा दावा केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये तर भाजप स्पष्ट बहुमतात सरकार स्थापन करणार असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. तर बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्यासोबतच मैदानात उतरणार असंही त्यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाह बोलत होते.
अमित शाह यांनी यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. तसेच झारखंडमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी त्यांनी घेतली. झारखंडमध्ये भाजप सरकारने उत्तम काम केले. मात्र तरी काही बाबतीत आम्ही मागे राहिलो. या पराभवाची समिक्षा होणार आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजप शतप्रतिशत सरकार बनवणार असा दावा शाह यांनी केला.
शाह यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर टीका केली. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अरविंद केजरीवाल अपयशी ठरले. जतनेतेला सर्व ठावूक असल्याचे सांगत दिल्लीतही भाजपच जिकेंल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.