लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने राजकीय लढाईत आप मागे पडली होती. परंतू, आता तुरुंगाबाहेर आल्या आल्या केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन या अटकेमागे असलेल्या मनसुब्यांना सुरुंग लावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. २०२४ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक लागणार आहे. यामुळे केजरीवालांनी नवी खेळी खेळत विरोधकांचा डाव उलटविला असल्याचे बोलले जात आहे.
केजरीवालांच्या निवासस्थानी आज आपची मोठी बैठक होत आहे. केजरीवाल उद्या १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. ते त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील अशी टीका भाजप करत आहे. परंतू, केजरीवाल तुरुंगात असताना आपचा किल्ला लढविणाऱ्या मंत्री आतिशी यांना मुख्यमंत्री करण्याची दाट शक्यता आहे.
आजच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच जर आतिशी मुख्यमंत्री झाल्या तर दोन मंत्रिपदे रिकामी होणार आहेत. यामुळे पक्षाच्या बैठकीत या दोन नावांवरही चर्चा होणार आहे.
एक आतिशी यांचे पद रिक्त होणार असून दुसरे पद हे राजकुमार आनंद यांच्या राजीनामा दिल्यानंतर रिक्त आहे, त्यावर देखील मंत्री नियुक्त करण्यात येमार आहे. या मंत्रिपदांवर नव्या चेहऱ्यांना संधई मिळण्याची शक्यता आहे. तसेच अन्य मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होऊ शकतात.
बैठकीसाठी मनीष सिसोदिया, राघव चड्ढा आदी महत्वाचे नेते पोहोचले आहेत. सौरभ भारद्वाज यांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. भारतीय जनता पक्षाविरोधात प्रचंड नाराजी आहे. ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे लागले आहेत आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. जोपर्यंत जनता सांगणार नाही तोपर्यंत मी सत्तेच्या या खुर्चीवर बसणार नाही, असे सांगत केजरीवालांनी तुरुंगातून बाहेर आल्या आल्याच राजीनाम्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून केजरीवाल यांना गोवण्यात आले आणि त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश झाला, असे भारद्वाज म्हणाले.