नवी दिल्ली : चाळीस तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर उन्नाव बलात्कार पीडितेने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेचे पडसाद दिल्लीच्या रस्त्यांवर उमटले. सायंकाळी पाचनंतर दिल्लीत विविध संस्थांनी आंदोलन केले.यात हजारो दिल्लीकर उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्यामुळे पोलिसांचीही दमछाक उडाली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांच्या नेतृत्वात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने आज तीव्र रूप धारण केले.
आंदोलकांनी तिरंगा हातात घेतला होता. महिलांची सुरक्षा वाºयावर सोडणाºया सरकारला ‘बेटी बचाओ’चा नारा देण्याचा अधिकार नाही, असे आंदोलक म्हणत होते. यावेळी तणावाच्या स्थितीमुळे काही तरुणी भोवळ येऊनही पडल्या. त्याचवेळी जंतरमंतर येथे एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी महिला सुरक्षेच्या संदर्भात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. यातही जवळपास पाचशे लोकांनी सहभाग घेऊन ‘आरोपींना फाशी द्या’ या मागणीचे फलक धरलेले होते.
अनेकांनी पोलिसांवर पाण्याच्या बॉटल्स फेकून मारल्या. स्वाती मालीवाल यांचे छायाचित्र असलेले पॉम्पलेट घेऊन बलात्काराच्या आरोपींना एक महिन्याच्या आत फाशीवर लटकवा, अशी मागणी ते करू लागले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात जोरदार नारेबाजी सुरू झाली. शांततेत निघणाºया मोर्च्याने उग्र रूप धारण केल्यामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना (सीआयएसएफ) पाचारण करण्यात आले.
६ डिसेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास उन्नाव पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे संवेदनशील व ल्युटियन्स झोनमध्ये सुरक्षा चोख करण्यात आली होती. प्रत्येक चौकांत, मार्गावर अधिकचे जवान तैनात करण्यात आलेहोते.
बलात्काराच्या आरोपीस अटक
केरळातील कंजिरापल्ली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेतील आरोपी अरुण सुरेश याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्याला पोलिसांनी पकडले.च् गुरुवारी एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तो फरार झाला होता. घटना घडली तेव्हा मुलगी नुकतीच शाळेतून आली होती. ‘मी तुझ्या भावाचा मित्र आहे, मला प्यायला पाणी दे’, असे सांगून तो घरात घुसला होता.