नवी दिल्ली : दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदान क्रिकेटच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक सामने या ठिकाणी रंगले आहेत. क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मैदान सध्या स्थलांतरित मजुरांचे केंद्र बनले आहे. स्थलांतरित मजुरांना रेल्वेने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार येथे परत पाठविण्याआधी तीन दिवसांपासून त्यांच्या राहाण्याची व्यवस्था या मैदानात केली होती. तिथे त्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतर, त्यांना रेल्वे स्थानकावर नेण्यात आले.फाळणीच्या काळातही कोटला मैदानाचा उपयोग क्रिकेट व्यतिरिक्त अन्य गोष्टींसाठी करण्यात आला नव्हता, असे या क्षेत्रातले जुनेजाणते लोक सांगतात. १९५९ ते १९७३ या काळात प्रथम दर्जाचे क्रिकेट सामने खेळलेले कर्नल विजय भूषण यांनी सांगितले की, फिरोजशहा कोटला मैदानाचा क्रिकेटऐवजी अन्य कारणासाठी उपयोग झाल्याचे पहिल्यांदाच पाहण्यात आले आहे. या मैदानामध्ये दोन ते अडीच हजार स्थलांतरित मजूर गेल्या तीन दिवसांपासून राहात होते. या मजुरांची शेवटची तुकडी ट्रेनने रवाना झाल्यानंतर फिरोजशहा कोटला मैदानाचे पुन्हा सॅनिटायझेशन करण्यात आले.दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) सहसचिव राजन मनचंदा यांनी सांगितले की, फिरोजशहा कोटला मैदानामध्ये येत्या काही दिवसांत आणखी स्थलांतरित मजुरांच्या राहाण्याची सोय करण्यात येईल, असे दिल्ली सरकारतर्फे सांगण्यात आले होते. या मजुरांसाठी हे मैदान वापरण्याच्या फक्त पंधरा मिनिटे आधी दिल्ली सरकार वदिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) फिरोजशहा कोटला मैदानाच्या व्यवस्थापनाला ही गोष्ट कळविली. त्यानंतर दिल्ली सरकारने बेडसहित सर्व सामान या मैदानात आणण्यात आले होते.मुख्यमंत्री, पंतप्रधान मदतनिधीला देणगी- क्वारंटाइनसाठी फिरोजशहा कोटला मैदान उपलब्ध करून देण्याबाबत डीडीसीएने या अगोदरच केंद्र सरकारला कळविले होते; तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री मदतनिधीला ५ लाख, तर पंतप्रधान मदतनिधीला ११ लाख रुपयांची देणगीही दिली होती. फिरोजशहा कोटला मैदानाचा स्थलांतरित मजुरांच्या निवासी व्यवस्थेसाठी वापर करण्यात आला. स्थलांतरित मजुरांची निवासव्यवस्था फिरोजशहा कोटला मैदानातील ड्रेसिंगरूम; तसेच पिचेसची जागा सोडून उर्वरित जागेत करण्यात आली होती.
दिल्लीचे फिरोजशहा कोटला मैदान बनले स्थलांतरित मजुरांचे केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:28 AM