नवी दिल्ली- दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पांची सुरुवात रालोआ सरकारने केली होती. त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणार आहे.या प्रकल्पांमध्ये इस्टर्न पेरिफेरल मार्ग आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. यामुळे राजधानी आणि आजूबाजूच्या परिसराती वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. दिल्लीमध्ये वाढलेली वाहनांची संख्या आणि होणारी वाहनांची कोंडी यामुळे दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळीही वाढली होती. दिल्लीतील प्रदुषण व कोंडी कमी करण्यासाठी दिल्ली सरकार व केंद्र सरकार यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना भेटून पिकांसाठी जमिनीवर पाचट जाळण्याची परंपरा बंद करावी यासाठी विनंती केली होती. त्याचाही समावेश आहे.दिल्ली मेरठ एक्स्प्रेस मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान दिल्ली- उ.प्र सीमेवरील अक्षरधाम मंदिरालाही भेट देतील असे सांगण्यात येत आहे. तेथून ते उत्तर प्रदेशातील बागपत येथे जातील व इस्टर्न पेरिफेरल मार्गाचे उद्घाटन करुन एका जनसभेला संबोधित करतील.दिल्ली आणि मेरठ या एक्सप्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी 9 किमी असून त्यात 14 मार्गिका आहेत. निजामुद्दिन पुलापासून दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंत हा रस्ता असेल. उर्वरित 96 किमीचा मार्ग टप्प्याटप्प्याने 2019-2020 पर्यंत पूर्ण केला जाईल.ईस्टर्न पेरिफेरल मार्ग 135 किमी असून त्यासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएजा, पलवलला सिग्नलमुक्त रस्त्याने जोडले गेले असून त्यामुळे राजधानीतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
दिल्लीची वाहतूक व्यवस्था सुधारणार; पंतप्रधान करणार दोन एक्स्प्रेस मार्गांचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 1:15 PM