चेन्नई : बाळाच्या जन्मासाठी चांगल्या रुग्णालयात प्रसूती व्हावी, अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. मात्र, एका जोडप्याने रुग्णालयात न जाता चक्क व्हॉट्सॲप ग्रुपवरुन मिळालेल्या सुचनांवरून घरीच प्रसूती केली. बाळाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा प्रकार परिसरातील जन आरोग्य अधिकाऱ्याला कळाला. त्याने या जोडप्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता या जोडप्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
ही घटना तिरुवन्नामलाई येथील आहे. तेथे राहणाऱ्या मनोहरन (३६) आणि सुकन्या (३२) या जोडप्याचे हे तिसरे अपत्य होते. ते ‘होम बर्थ एक्स्पिरियन्स’ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य होते.
त्यात घरीच प्रसूती कशी करावी, याबाबत अनेक पोस्ट टाकण्यात आला आहे. त्यावर या जोडप्याने विश्वास ठेवला. सुकन्या तिसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीत मनोहरन याने चिकित्सा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
ग्रुपमध्ये मिळत हाेत्या सूचना
सुकन्याला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याऐवजी व्हॉट्सॲप ग्रुपची मदत घेण्यात आली. तिथे असलेल्या सदस्यांनी मनोहरनला सूचना दिल्या.
त्याच्या आधारे त्याने घरीच पत्नीची प्रसूती केली. या ग्रुपमध्ये १ हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. मनोहरन हा अर्थमूव्हर ऑपरेटर म्हणून काम करतो.
पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलाविले आणि मोबाइलची तपासणी केली. त्यावेळी व्हॉट्सॲप ग्रुपबाबत माहिती झाली. अशा प्रकारे घरीच प्रसूती केल्यामुळे बाळाचा तसेच सुकन्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती.