UP Crime : उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये महागड्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाचा मृतदेह डिलिव्हरीच्या बॅगेत भरून इंदिरा कालव्यात फेकून देण्यात आला होता. कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी ही घटना उघडकीस आणली. मुलाच्या हत्येची बातमी कळताच कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
फ्लिपकार्टमधून दीड लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयची हत्या झाल्याची खळबळजनक उडाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या या हत्येचा खुलासा उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी केला. दीड लाख रुपयांच्या आयफोनची ऑर्डर देऊन आरोपींनी डिलिव्हरी बॉयची लूट केली आणि त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह कालव्यात फेकून दिला. डिलिव्हरी बॉयचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. एसडीआरएफची टीम कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनहट येथे राहणाऱ्या गजानन उर्फ गजेंद्र याने फ्लिपकार्टवरुन दोन महागडे फोन मागवले होते. त्याचे पैसे डिलिव्हरी झाल्यावर देण्यात येणार होते. २३ सप्टेंबर रोजी निशांतगंज येथे राहणारा भरत साहू हा हे फोन देण्यासाठी गजेंद्र याच्या घरी पोहोचला होता. भरतने फोन देऊन गजेंद्रला पैसे देण्यास सांगितले. त्यावेळी गजेंद्रने त्याला घरात बोलवलं. खोलीत शिरताच गजेंद्र आणि त्याच्या मित्राने भरत साहूची गळा दाबून हत्या केली. रात्रीच दोघांनी भरतचा मृतदेह डिलिव्हरीच्या बॅगेत भरला आणि ती बॅग इंदिरा कालव्यात फेकून दिली.
बराच वेळ झाला तरी भरत घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध सुरु केला. २५ सप्टेंबर रोजी त्याच्या घरच्यांनी भरत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भरतच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन आणि कॉल डिटेल तपासले. त्यातील शेवटच्या नंबरच्या आधारे पोलीस गजेंद्र पर्यंत पोहोचले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांना गजेंद्रवर संशय आला. गजेंद्र वारंवार गोष्टी बदलून सांगत होता. त्यानंतर पोलिसांनी भरतच्या कंपनीसोबत चर्चा केली तेव्हा गजेंद्रने दोन फोन मागवल्याची माहिती समोर आली. दोन्ही मोबाईलची किंमत १.०५ लाख रुपये होती.
भरतच्या कुटुंबियांनी त्याच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांपासून बड्या अधिकाऱ्यांना पत्र लिहीले होते. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी योजना आखत भरतला रात्री बोलवलं होतं. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्याच डिलिव्हरी बॅगमध्ये भरुन कालव्यात फेकून दिला. भरतची बाईक घटनास्थळा जवळ आढळून आली आहे. पोलीस भरतच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहेत.