आजकाल अनेकदा आपण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असलो किंवा काही विशेष असेल तर बाहेरुन ऑनलाईन पर्यायांचा वापर करून जेवण मागवतो. दरम्यान, एका तरूणीनं व्यस्त असल्यामुळे Online Food Delivery अॅप झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं होतं. परंतु उशिर झाल्यामुळे त्या तरूणीनं ती ऑर्डर रद्द केली होती. त्यानंतरही डिलिव्हरी बॉय ती ऑर्डर घेऊन आला आणि स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी त्यानं आपल्या नाकावर बुक्का मारला. त्यामुळे आपल्या नाकातून रक्तही येऊ लागल्याचा दावा बंगळुरूतील एका तरूणीनं व्हिडीओद्वारे केला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्या डिलिव्हरी बॉयला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला या प्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बंगळुरूचे डिसीपी (साऊथ-ईस्ट) जोशी श्रीनाथ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, झोमॅटोनही या प्रकरणी हितेशा या तरूणीची माफी मागितली आहे.
या व्हिडीओमध्ये त्या तरूणीनं आपल्यासोबत घडलेल्या घटनेचं वर्णनही केलं आहे. आपण केलेली ऑर्डर येण्यास उशीर झाल्यामुळे कंपनीच्या कस्टमर केअरला माहिती देऊन तिनं ऑर्डर कॅन्सल केली होती. ज्यावेळी ती महिला कस्टमर केअरसोबत बोलत होती त्याचवेळी डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. आपण अर्धाच दरवाजा उघडला आणि जेवण घेण्यास नकार दिला. त्यावेळी डिलिव्हरी बॉयनं आपल्यासोबत वाद धावण्यास सुरूवात केली. परंतु त्यानंतर त्यानं घरात शिरून जेवण ठेवलं. ज्यावेळी त्याचा आपण विरोध केला तेव्हा त्यानं तुमचा नोकर आहे का असं विचारत आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा दावा तरूणीनं व्हिडीओद्वारे केला होता.