हरीश गुप्तानवी दिल्ली : नवी स्वरूपातील डेल्टा प्लस विषाणूचा फैलाव वेळीच न रोखल्यास भयानक परिणाम होऊ शकतात, हा धोका ओळखून केंद्र सरकारने या विषाणूचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी प्रतिबंधक उपायांसह पावले उचलली आहेत. या धोकादायक विषाणूचा जनुकीयक्रम जुळविण्यासाठी महाराष्ट्रासह, गुजरात, दिल्ली आणि अन्य राज्यांतून ३५,००० नुमने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची केंद्र सरकारच्या विविध प्रगत प्रयोगाशाळेत तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लस नवीन स्वरूपाचा विषाणू आढळल्याच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तावर बोलताना भारताच्या राष्ट्रीय प्रतिक्षमीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे चेअरमन (एनटीएजीआय) प्रो. डॉॅॅ. एन. के. अरोरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, नवीन स्वरूपातील हा विषाणू आढळताच आम्ही तत्परतेने पावले उचलली आहेत. त्यामुळे केंद्र सरकार राज्यांना सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्याबाबत (अनलॉकिंग) सातत्याने बजावत आहे.
स्थानिक निर्बंध लागू करून या विषाणूचा प्रसार रोखण्यावर नवीन रणनीतीवर भर देण्यात आला आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतही मोठ्या संख्येने डेल्टा प्लस विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत. डेल्टा प्लस हा विषाणू बी १.६१७.२ या विषाणूचे नवीन स्वरूप असून हा विषाणू अधिक धोकायदायक आणि संसर्गजन्य आहे, असे प्रो. अरोरा यांनी सांगितले.
हा चिंताजनक विषाणू असल्याचे अमेरिकने म्हटले आहे, तर ब्रिटन सरकारलाही लॉकडाऊन चार आठवड्यांनी वाढवावा लागला. महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी फेब्रुवारी-मार्चमध्येच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अपेक्षेपेक्षा अधिक झपाट्याने या विषाणूने हातपाय पसरले. डॉ. साळुंके यांनी राज्य सरकारला याबाबत लेखी कळविले होते; तसेच आयसीएमआरचे महासंचालक आणि कोविडवरील पंतप्रधानांच्या कृती गटाच्या प्रमुखांनाही फोनवरून याची कल्पना दिली होती.