नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे. देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र डेल्टा प्लसमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहे.
कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत ६० टक्के अधिक संक्रामक आहे. डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची गरज भासू शकते. अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टाच्या बाबतीत रुग्णालयाची आवश्यकता जास्त प्रमाणात लागू शकते. त्यामुळेच जग एका धोकादायक टप्प्यातून जात असल्याचं म्हटलं आहे. डेल्टाचा सर्वाधिक धोका कोणाला आहे याची माहिती देत आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार गंभीर आजार असलेल्या आणि वृद्ध व्यक्तींना डेल्टा व्हेरिएंटचा अधिक धोका आहे. पल्बिक हेल्थ इंग्लंडनंदेखील (पीएचई) डेल्टा व्हेरिएंटबद्दल सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तरुणांना डेल्टा व्हेरिएंटचा अधिक धोका असल्याचं पीएचईचं संशोधन सांगतं. 'लसीकरण न झालेल्या व्यक्तींना डेल्टाचा अधिक धोका आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यास डेल्टा व्हेरिएंटविरोधात अधिक सुरक्षा मिळते. त्यामुळे डेल्टापासून संरक्षण मिळवायचं असल्यास लसीकरण आवश्यक आहे,' असं संशोधक सांगतात.
फायझर, ऍस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यास डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याची गरज ९० टक्क्यांनी कमी होते. ऍस्ट्राझेनेकाची लस भारतात कोविशील्ड नावानं उपलब्ध आहे. पुण्यातील इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या (आयसीएमआर-एनआयव्ही) संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि बीटा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरते.