तिरुअनंतपुरम : केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने आज गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आजपर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे.
आज पावसाने थोडी उसंत घेतल्याने शिबिरांमध्ये आश्रय घेतलेल्या काही कुटुंबांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. केरळमध्ये राज्यभरात 5645 शिबिरे उघडण्यात आली आहेत. यामध्ये जवऴपास 7.24 लाख लोक राहत आहेत. भारतीय सेनेने आतापर्यंत 30 हजार लोकांनी वाचविले आहे, तर 3500 लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवली आहे.
केरळमध्ये सध्या अन्न आणि वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात येत असून या बरोबरच इलेक्ट्रीशियन, प्लंबरचीही गरज मोठ्या प्रमाणावर असल्याचे केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांनी सांगितले. केरळमध्ये अजुनही हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. चेंगन्नूर, पांडलम, तिरुवल्ला सारख्या दुर्गम भागांमध्ये अडकलेल्या या लोकांकडे पिण्याचे पाणी, अन्न नाही.
युएईच्या उद्योजकांकडून 12.5 कोटींची मदतकेरळच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या तीन भारतीय उद्योजकांनी 12.5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर युएईने 34 कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.