मांडवड : अधिकार्यांचा बेजबाबदारपणा व उदासीनतेमुळे जनतेसाठी असणार्या चांगल्या उपक्रमांची कशी वाट लावली जाते याचा अनुभव मंगळवारी (दि. २४) आयोजित करण्यात आलेल्या भालूर गटातील प्रभाग समितीच्या बैठकीच्या निमित्ताने जनतेस व लोकप्रतिनिधींना आला. एरव्ही अनेकवेळा अधिकारी नसल्याने ग्रामसभा, आमसभा, प्रभागसभा तहकूब करण्यात आल्याचे प्रकार अनेकवेळा घडल्याचे ऐकण्यास मिळतेे; परंतु मंगळवारी भालूर येथे प्रभाग सभेत अधिकारी हजर मात्र ग्रामस्थच गैरहजर राहिल्याने सभा तहकूब करावी लागल्याची घटना घडली.नांदगाव तालुक्यातील भालूर जिल्हा परिषद गटाचे जि. प. सदस्य अशोक जाधव यांनी आपल्या गटाची प्रभाग समितीची सभा दि. २४ मार्च रोजी भालूर येथे आयोजित केलेली होती. त्यासाठी नियोजित सभेच्या अध्यक्षांसह तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी वेळेवर हजर झाले; मात्र या जिल्हा परिषद गटात एकूण ३६ महसूल गावांचा समावेश असतानाही या सभेसाठी केवळ दहाच नागरिक उपस्थित होते. तरीही अधिकार्यांनी सभा घेण्याचे ठरविले; परंतु भालूर येथील शिवसेनेचे शिवाजी ढगे व लक्ष्मीनगरचे बापुसाहेब जाधव यांनी सभेस पुरेसे नागरिक उपस्थित नसल्याचा सवाल करीत सदरची सभा तहकूब करण्याची मागणी केली.प्रभाग समितीची सभा आयोजित केलेली असल्याची माहिती गटातील नागरिकांना देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची जनजागृती झालेली नसल्याची बाब सभेच्या अध्यक्षांच्या लक्षात आणून देत सभा रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.सभेचे सचिव विस्तार अधिकारी ढवळे यांनी एकवेळी ग्रामसेवकांना सभेबाबत सुचित केल्याने कोणत्याही ग्रामसेवकांनी जनजागृती गावात करू शकले नाही हे निदर्शनास आले. या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभाग समितीच्या बैठकीचा फज्जा उडविण्यास केवळ विस्तार अधिकारी ढवळे हे जबाबदार असल्याने तीव्र संताप व्यक्त करून सभा तहकूब करण्यात आली. व तालुकास्तरावरून आलेला अधिकार्यांचा फौजफाट्यासह लोकप्रतिनिधींना ही आल्या पावली परत जाण्याची नामुष्की पत्करावी लागली. (वार्ताहर)----चौकटया विभागाचे विस्तार अधिकारी ढवळे यांच्या अकार्यक्षमेतमुळेच आजची प्रभाग समितीची सभा तहकूब करावी लागल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला असून, याची सखोल चौकशी करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येऊन आज तहकूब करण्यात आलेली सभा पुढील आठवड्यात संपूर्ण जणजागृती करून घेण्यात येईल. अशोक जाधव जिल्हा परिषद भालूर गट, अध्यक्ष प्रभाग समिती.
ग्रामस्थांच्या गैरहजेरीमुळे प्रभाग सभा रद्द चौकशीची मागणी : विस्तार अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
By admin | Published: March 24, 2015 11:07 PM