वाराणसी : दारूल उलूम देवबंदवर बंदी आणून या संस्थेला मिळणा-या पैशांची चौकशी करण्याची मागणी मुस्लीम महिला फाउंडेशनने केली आहे. १८ आॅक्टोबर रोजी महिला फाउंडेशनने श्रीरामाची आरती केल्यानंतर देवबंदने शनिवारी फाउंडेशनविरोधात फतवा जारी करून त्याला मुस्लीम म्हणून विचारात घेतले जाणार नाही, असे म्हटले होते.या महिलांनी काही तरी चुकीचे केले असून त्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला पाहिजे, असे फतव्यात म्हटले होते. मुस्लीम महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा नाझनीन अन्सारी म्हणाल्या की, उलेमांना कोणाविरुद्ध कोणताही आदेश द्यायला किंवा धर्माच्या संदर्भातील त्यांची मते कोणावरही लादण्यास इस्लाम परवानगी देत नाही. ते इस्लामच्या मूळ स्वरूपानुसार शिफारशी किंवा सल्ला देऊ शकतात. त्यांना इस्लाममधून कोणालाही बहिष्कृत करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकरणांवर जर ते सतत फतवे जारी करीत राहिले तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करू, असेही अन्सारी म्हणाल्या.मुस्लीम असल्याचा मला अभिमान आहे. इस्लामच्या आज्ञांचे पालन मी करते. मुस्लीम असल्यामुळे मी अशा फतव्यांपुढे मान झुकवणार नाही, असेही नाझनीन अन्सारी म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
दारूल उलूम देवबंदवर बंदी घाला, मुस्लीम महिला फाउंडेशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:54 AM