Mamata Banerjee kolkata doctor case : आंदोलन करत असलेल्या ज्युनिअर डॉक्टरांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत बैठक झाली. या बैठकीत पाच मागण्या ममता बॅनर्जींकडे करण्यात आल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, कोलकाताचे पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. आयपीएस मनोज कुमार वर्मा यांची कोलकाता पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसरा महत्त्वाचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घेतला असून, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालक यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोलकाताचे पोलीस आयुक्त आयपीएस विनीत गोयल यांची पश्चिम बंगालचे एसटीएफचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे.
कोण आहेत मनोज कुमार वर्मा?
कोलकाताच्या पोलीस आयुक्तपदी बदली झालेले IPS मनोज कुमार वर्मा हे १९९८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते पश्चिम बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते बैरकपूरचे पोलीस आयुक्त आणि सुरक्षा संचालनालयामध्ये अतिरिक्त संचालक ही होते.
मनोज कुमार वर्मा पश्चिम बंगालमधील अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत, ज्यांना नक्षल प्रभावित जंगलमहल क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. ते सर्वाधिक नक्षलग्रस्त क्षेत्रात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.
इतर पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या
कोलकाता पोलीस आयुक्तांची बदली करण्याबरोबरच इतर अधिकाऱ्यांनाही नवी ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. आयपीएस जावेद शमीम यांनी पश्चिम बंगालच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) पदी बदली करण्यात आली आहे. आयपीएस दीपक सरकार यांची कोलकाता पोलीस विभागात पोलीस उपायुक्त (उत्तर) पदी बदली करण्यात आली आहे.
"डॉक्टरांविरोधाक कारवाई होणार नाही"
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आंदोलक डॉक्टरांसोबतची बैठक सकारात्मक राहिली. पाच मागण्या मान्य करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ज्युनिअर डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. पाचपैकी तीन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देताना ममता बॅनर्जींनी डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते.