नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर सैरभेर झालेल्या काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून अनिश्चितता असताना माजी केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांनी विराजमान व्हावे अशी मागणी केली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल यांनी सांभाळण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्रीयमंत्री आणि दिल्लीतील काँग्रेसनेते अजय माकन यांनी ही मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे घेण्यासाठी हीच योग्य वेळ असून पक्षात त्यांना अध्यक्षपदासाठी सर्वाधिक पाठिंबा असल्याचा दावा माकन यांनी केला.
माकन पुढे म्हणाले की, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आता युवा नेत्यांसाठी रस्ता तयार करून देणे गरजेचे आहे. पक्षात ठरविक वेळत बदल न केल्यास पक्षातील नेते पक्षांतर करतात. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त दुसरा चेहरा दिसत नाही जो की सर्वांना मान्य राहिल. राहुल मनाने साफ असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते सातत्याने विरोध करत आले आहेत. तसेच सामान्यांच्या समस्यांसाठी ते लढा देऊ शकतात, असंही माकन यांनी सांगितले.
दरम्यान विद्यामान अध्यक्षा सोनिया गांधी या दीर्घकाळासाठी पक्षाच्या सल्लागार असव्या. कारण नव्या अध्यक्षांना सोनिया यांच्या अनुभवाची गरज भासणार आहे. त्यासाठी पक्षाच्या संविधानात बदल करता येऊ शकतो. मात्र लवकरात लवकर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी विराजमान व्हावे, जेणेकरून अनिश्चितता समाप्त होईल, असंही माकन यांनी स्पष्ट केले.