कोलकाता - पश्चिम बंगालमधील बराकपोर मतदारसंघात सोमवारी मतदानांच्या वेळी हिंसाचार झाला आणि त्यामुळे तिथे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली असली तरी भाजपचे उमेदवार अर्जुन सिंह यांनीच एका मतदान केंद्राचा ताबा घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.एका मतदान केंद्रावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी कब्जा केल्याची माहिती मिळताच, भाजप उमेदवार अर्जुन सिंह आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहाचले. प्रत्यक्षात तिथे तसे काहीही घडले नव्हते. मात्र मतदान केंद्रात ते शिरले आणि त्यांनी बाहेर उभे असलेले सर्व मतदार हे तृणमूलचे कार्यकर्ते असून, ते जाईपर्यंत मतदान थांबवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे चिडलेल्या मतदारांनी त्यांनाच घेराव घातला. अनेकांनी आपल्या हातातील मतदार ओळखपत्र त्यांना दाखवले. पण भाजप कार्यकर्ते त्यांना मतदान केंद्रात जाऊ देईनात. त्यातच तृणमूलचे कार्यकर्तेही तिथे आले आणि मग भाजप व तृणमूल कार्यकर्त्यांत बाचाबाची व हाणामारी झाली. त्यानंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी आपणास मारहाण केल्याचे अर्जुन सिंह यांनी सांगितले.केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान दारूच्या नशेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, आमच्या बुथ प्रतिनिधींना केंद्रात जावू दिले नाही. अनेक केंद्रामध्ये तृणमूलचे कार्यकर्तेच आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावापुढील बटण दाबत असून, मतदारांना मतदान करू देत नाहीत. त्यामुळे फेरमतदान घेण्यात यावे, अशी आपली मागणी आहे.निवडणुकीच्या तोंडावर अर्जुनसिंह भाजपमध्येअर्जुन सिंह हे तृणमूल काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही मिळाली. त्यामुळे भाजपचे ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. माजी रेल्वेमंत्री व विद्यमान खासदार दिनेश त्रिवेदी हे तृणमूलचे उमेदवार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गार्गी चटर्जी व काँग्रेसचे मोहम्मद आलम हेही रिंगणात आहेत.
बराकपोरमध्ये भाजप-तृणमूलमध्ये बाचाबाची, फेरमतदानाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 5:56 AM