अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 04:19 AM2020-11-26T04:19:24+5:302020-11-26T04:19:32+5:30
जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन अशा वेळी झाले जेव्हा काँग्रेस स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काँग्रेसमध्ये कामराज यांच्यानंतर तीन संकटमोचक होते ते म्हणजे प्रणव मुख़र्जी, जितेंद्र प्रसाद आणि अहमद पटेल. मुख़र्जी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षापासून दूर गेले. जितेंद्र प्रसाद यांचे आधीच निधन झाले तर आता फक्त पटेल राहिले होते.
जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले. पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत अहमद पटेल यांनी सगळ्या आघाड्यांवर महत्वाची भूमिका पार पाडली. पक्षासमोर आता काही मोजकेच चेहरे आहेत जे पक्षाला संकटातून बाहेर काढू शकतील. या मोजक्या नेत्यांमध्ये ऐ. के. अँटोनी, पी. चिदंबरम, अशोक गेहलोत आणि ग़ुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे.
ॲंटोनी आजारी असून पक्षाला जेवढी सक्रियता हवी तेवढी ते दाखवू शकत नाहीत. चिदंबरम यांचा स्वभाव आणि भाषा ही अडचण आहे. अशोक गेहलोत यांचे नाव पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण ते गांधी कुटुंबाच्या जवळचे आहेत. ग़ुलाम नबी आझाद सध्या ग्रुप २३ चे सदस्य असून पक्ष नेतृत्वाची त्यांच्यावर नाराजी आहे.