नवी दिल्ली : वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार हा एक प्रकारे लोकशाहीवरील हल्ला असून, धर्मनिरपेक्षता व अनेकत्वाचा आदर न केल्यास गणराज्य धोक्यात येईल, असा इशारा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेवर त्यांनी चिंताही व्यक्त केली.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘स्वातंत्र्याशिवाय शांतता नाही, शांततेशिवाय स्वातंत्र्य नाही : नेहरूंचा वारसा आणि भारताचे भविष्य ’ हा या दोनदिवसीय संमेलनाचा विषय आहे. सिंग म्हणाले, की धर्मनिरपेक्षता हे भारतीय गणराज्यासाठी विश्वासाचे कलम आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाची श्रद्धा, विश्वास व पूजा करण्याच्या मूलभूत स्वातंत्र्याला संरक्षण मिळाले आहे. भारतीय संविधानाअंतर्गत सर्व धर्मांचा समान आदर करण्यात आला आहे. असे असताना काही कट्टरपंथी समूहांतर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. विचारांशी मतभिन्नता, भोजन वा जातीला आधार बनवून विचारवंतांची हत्या करणे समर्थनीय ठरू शकत नाही. असहमत होण्याचा अधिकार दडपण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले. (वृत्तसंस्था)
....हा तर लोकशाहीवर हल्ला - मनमोहन सिंग
By admin | Published: November 07, 2015 1:28 AM