म्युनिक : प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाही मूल्यांची प्रशंसा केली. जी-७ शिखर परिषदेसाठी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यांवर त्यांचे रविवारी म्युनिकमध्ये आगमन झाले. म्युनिक येथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.येथील ऑडी डोम इनडोअर एरिनामध्ये आयोजित एका कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ४७ वर्षांपूर्वी लोकशाहीला ओलीस ठेवणे आणि लोकशाही तुडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणीबाणी भारताच्या चैतन्यपूर्ण लोकशाहीवरील काळा डाग आहे. आम्हा भारतीयांना लोकशाहीचा अभिमान वाटतो. भारत लोकशाहीची जननी आहे, असे प्रत्येक भारतीय गर्वाने म्हणू शकतो. बर्लिनस्थित भारतीय दूतावासाने ट्विट केले की, म्युनिक येथे राजदूत हरीश पर्वतनेनी आणि श्रीमती नंदिता पर्वतनेनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे म्युनिक विमानतळावर स्वागत केले. भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळावर बव्हेरियन बँडने त्यांचे स्वागत करण्यात आले.
"प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये लोकशाही," जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:34 AM