सिमडेगा : लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते, असे कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी ठासून सांगितले. कोणते काम केले पाहिजे, ते आमच्या पक्षाच्या सरकारला सांगा, ते केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रचार सभेत ते म्हणाले की, लोकशाहीत तुम्हीच मालक आहात, याचा विसर पडू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणी नेता तुमचा मालक नाही. काय केले पाहिजे ते फक्त तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही ते करू. कॉँग्रेस ज्या महाआघाडीचा भागीदार आहे, ती जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका करून, आपण येथे मन की बात ऐकविण्यासाठी नव्हे, तर तुमचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आलो आहोत, असेही ते म्हणाले.
कृषी क्षेत्र संकटात असताना मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जे मिळू दिली नाहीत. मोदी सरकारने जवळच्या १५ ते २० उद्योगपतींना मात्र फायदा करून दिला, या आरोपाचा गांधी यांनी पुनरुच्चार केला. आदिवासींची जमीन हिरावून घेतली जाऊ नये, यासाठी आमचा पक्ष वचनबद्ध असल्याचे सांगून, जीएसटीची अंमलबजावणी हलगर्जीपणे केल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. कॉँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर दरमहा १२ हजार रुपयांपेक्षा ज्या कुटुंबांचे उत्पन्न कमी आहे, अशांच्या बँक खात्यात दरवर्षी ७२ हजार रुपये जमा केले जातील. देशातील पाच कोटी कुटुंबांना या न्याय रोजनेचा लाभ मिळेल. कॉँग्रेस गरिबांवर रुग्णालयांमध्ये नि:शुल्क उपचार करण्याची योजना आणेल, असे सांगून गांधी म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर कुशल कर्मचारी बळ निर्माण करता यावे यासाठी जिल्ह्यांमध्ये तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था उघडण्यात येतील.
मुंडा विरुद्ध मुंडायेथील खुंटी मतदारसंघातून काँग्रेसचे कालिचरण मुंडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री अर्जुनमुंडा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.