ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - मोदी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र सरकारवर कडाडून टीका करत 'मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे' असा आरोप केला आहे.
नेहमी शांत असणा-या मनमोहन सिंग यांनी बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आर्थिक आघाडीवरती परिस्थिती चांगली नसून सध्याच्या सरकारी धोरणामुळे आर्थिक घडी रुळावर येण्याची शक्यता कठीण असल्याचे सिंग यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपही फेटाळून लावले. मी स्वत:च्या वा कुटुंबियांच्या फायद्यासाठी पंतप्रधानपदाचा किंवा सरकारी कार्यालयाचा कधीच गैरवापर केला नाही असे त्यांनी सांगितले. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी मनमोहन सिंग यांच्यावर २ जी गैरव्यहहार प्रकरणी आरोप केला होता. ‘२ जी दूरसंचार लायसन्सेसप्रकरणी सहकार्य केले नाही तर परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी तत्कालीन पंतप्रधानांनी आपल्याला दिली होती असा आरोप बैजल यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना मनमोहन सिंग यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले.
तसेच युपीएच्या कार्यकाळातील धोरणे दुबळी असल्याची टीकाही चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'आम्ही जेव्हा सत्तेवरून पायउतार झालो तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जगात दुस-या क्रमांकावर होता', असे त्यांनी नमूद केले.