नवी दिल्ली : घराणेशाही जपणाऱ्या व एकाच कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्या चालविल्या जाणाऱ्या पक्षांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालत नाही. अशा पक्षांकडून लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण होण्याची अपेक्षा करता येणार नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. संविधान (राज्यघटना) दिनानिमित्त संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमावर काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता.
या बहिष्काराचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना देशाने स्वीकारली तो दिवस दरवर्षी राज्यघटना दिन म्हणून साजरा केला जातो. असा दिवस साजरा करण्याची गरज काय, असा प्रश्न विचारणाऱ्यांची मते आता देशातले नागरिक ऐकून घेण्यास तयार नाहीत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नजर टाकली तर लक्षात येईल की, देश एका संकटातून जात आहे. ही स्थिती घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांमुळे निर्माण झाली आहे. राज्यघटनेवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ही चिंतेची बाब आहे.राज्यघटना दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यावर काही लोकांनी आमच्यावर टीका केली. डाॅ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. त्या भव्य कामगिरीशी या दिवसाचा संबंध आहे, हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच २६ नोव्हेंबरला राज्यघटना दिन पाळण्याची प्रथा यापूर्वीच सुरू झाली असती, तर अधिक चांगले झाले असते.
भ्रष्टाचाऱ्यांचे उपद्व्याप विसरू नकानरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या, शिक्षा सुनावण्यात आलेल्या लोकांचे उपद्व्याप विसरणे, त्यांची स्तुती करणे अयोग्य आहे. सार्वजनिक जीवनात अशा गोष्टींपासून प्रत्येकाने लांब राहिले पाहिजे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले नागरिक तसेच हुतात्मा झालेले पोलीस यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.