नवी दिल्ली - दिल्लीच्या कित्येक एकर जमिनीवर पसरलेल्या हुमायूनचा मकबरा पाडून त्याठिकाणी कब्रस्तान तयार केले जावे, अशी मागणी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने केली आहे. यासाठी बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. दिल्लीत मृतदेहांचे दफन करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने हुमायूनचा मकबरा पाडण्यात यावा आणि त्याठिकाणी कब्रस्तान तयार करण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. वसीम रिझवी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात मुघलांचा दरोडेखोर असा उल्लेख केला आहे. पंतप्रधानांना लिहिण्यात आलेल्या या पत्रात वक्फ बोर्डनं नमूद केले आहे की, 35 एकर जमिनीवर असलेला हुमायूनचा मकबरा कब्रस्तानसाठी कामी येऊ शकतो. कारण हुमायू इस्लामिक प्रचारक नव्हता किंवा धर्मगुरूदेखील नव्हता. अशातच, दिल्लीतील कब्रस्तानांची क्षमता संपल्याने मृतदेहांचे दफन करण्यासाठी जागा शिल्लक नसल्यानं हुमायूनचा मकबरा जमिनदोस्त करण्याची मागणी शिया वफ्क बोर्डाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, ऑल इंडिया राबता-ए-मस्जिद आणि मद्रिस-ए-इस्लामिया या दोन संस्थांनी उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाला पत्र लिहिले होते. 'दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील भागांमध्ये कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या मुस्लिमांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचा आहे,' असे शिया वक्फ बोर्डाने मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 'हुमायूनचा मकबरा धार्मिक स्थळ नाही. त्याठिकाणी हुमायूनची कबर असल्याने ते कब्रस्तानच आहे', असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हुमायूनचा मकबराप्रमाणे काही दिवसांपासून ताज महलवरुन वादविवाद सुरू आहेत.