अमरावती - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा प्रजा वेदिका हे सरकारी निवासस्थान बुल्डोजरने पाडण्याचं काम सुरु आहे. परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर चंद्राबाबू नायडू प्रजा वेदिकावर पोहचले त्यावेळी तिथे हजारो टीडीपीचे कार्यकर्ते हजर होते. त्यांच्याविरोधानंतरही एक जेसीबी, 6 ट्रक आणि 30 कामगारांनी तोडकाम सुरु केलं.
मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी यांनी प्रजा वेदिका तोडण्याचे आदेश दिले आहेत. ज्यावर मंगळवारी रात्रीपासून तोडकामाला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळपासून पुन्हा ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. याआधी चंद्राबाबू नायडू यांनी प्रजा वेदिका हा बंगला विरोधी पक्षनेत्याचा बंगला म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र चंद्राबाबू नायडू यांची मागणी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी फेटाळली. राज्य सरकारने शनिवारी चंद्रबाबू नायडू याचा अमरावती येथील प्रजा वेदिका बंगला ताब्यात घेतला होता. त्यानंतर टीडीपीने याला द्वेषाचे राजकारण म्हटले होते.
अमरावती येथे प्रजा वेदिका या बंगल्याचं बांधकाम आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण(एपीसीआरडीए) कडून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून केलं होतं. पाच कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या या बंगल्याचा उपयोग चंद्राबाबू नायडू पार्टीच्या बैठकांसाठीही करत होते. तोडकाम करताना चंद्राबाबू नायडू यांचे सामान बाहेर फेकले असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बंगला तोडण्याचे आदेश दिल्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली. टीडीपी नेते आणि विधान परिषदेचे आमदार अशोक बाबू यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांनी नायडू यांचे सामान बाहेर फेकले. तसेच बंगला आणि परिसराचा कब्जा घेताना तो निर्णय पक्षाला कळविण्यात आला नाही. यावर आंध्र प्रदेशचे नगरविकास मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, चंद्राबाबू नायडू यांच्याशी तशाच रितीने व्यवहार केला जात आहे जसा त्यांनी जगन मोहन रेड्डी विरोधी पक्षाचे नेते असताना केला होता.