पानिपत (हरयाणा) : नोटाबंदीचे ‘शस्त्र’ आणि चुकीच्या जीएसटीने छोट्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान केला. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत त्यांनी देशात दोन हिंदुस्थान निर्माण झाले आहेत, एक शेतकरी आणि मजुरांसाठी आहे, तर दुसरा २००-३०० श्रीमंतांसाठी आहे, अशी टीका केली.
‘भारत जोडो यात्रे’अंतर्गत आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी, पंतप्रधान मोदींना कृषीविषयक तिन्ही कायद्यांबाबतची चूक मान्य करायला एक वर्ष का लागले, असा सवाल केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पुढील वर्षी १ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, या घोषणेवर निशाणा साधला. शहा यांनी अशी घोषणा केली म्हणजे ते मंदिराचे पुजारी आहेत का, असा सवाल त्यांनी केला.