नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात राजकीय वातावरण तापू लागले आहे. नेत्यांच्या रॅली आणि सभा सुरू झाल्यात. पक्षांच्या सभा सुरु होताच नेत्यांची वादग्रस्त विधानेही समोर आलीत. हरियाणातील कैथल इथं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला भाजपाला मतदान करणाऱ्या लोकांवर आणि समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कैथलच्या सभेत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, जे लोक भाजपाला मतदान करतात आणि त्यांचे समर्थन करतात ते सगळे राक्षस प्रवृत्तीचे आहेत. मी त्यांना महाभारताच्या भूमीवरून श्राप देतो. भाजपा-जजपा सरकार युवकांना नोकरी देत नाही. त्यांच्या संधीही हिसकावून घेत आहे. या राज्यातील युवक नोकरी करतील आणि त्यांचे भविष्य चांगले होईल असं सरकारला वाटत नाही असं त्यांनी म्हटलं.
भाजपाचा पलटवार
रणदीप सुरजेवाला यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष ओपी धनखड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कदाचित देवाने रणदीप सुरजेवाला यांची बुद्धीभ्रष्ट केलीय. भारतीय जनता पार्टीसाठी जनता मायबाप आहे. काँग्रेसनं त्याच जनतेला राक्षसची उपमा दिली जेव्हा त्यांनी काँग्रेसला मतदान केले नाही. असा अहंकार महाभारतातही हरला होता. पुढील निवडणुकीत तुमचाही पराभव होईल असं भाजपानं म्हटलं.
तर एकीकडे १४० कोटी जनता, मोदींसाठी जनता जर्नादन आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला जनता राक्षस दिसते. देशातील जनता काँग्रेस-भाजपातील हा फरक जाणते असं संबित पात्रा म्हणाले. त्याचसोबत राहुल गांधींना लॉन्च करण्यात काँग्रेस पार्टीला यश आले नाही त्यामुळे त्याचा राग जनतेवर काढला जातोय असं भाजपा प्रवक्ते गौरव भाटीया यांनी म्हटलं.