ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप असलेली केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज सकाळी जेटलींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनकांना पांगवण्यासाठी पोलिसांची पाण्याचा मारा केला तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले.
अरूण जेटली दिल्ली क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष असताना संघटनेच्या कारभारात गैरप्रकार झाला होता असा आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दिल्लीत क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले होते. तसेच ते मंत्रीमंडळात असेपर्यंत त्यांची सखोल चौकशी होऊ शकत नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रीमंडळातून काढावे, अशी मागणीही 'आप'तर्फे करण्यात आली होती.
मात्र भाजपाने जेटली यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखवत त्यांना पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी जेटली यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. तर आम्हाला अरुण जेटली यांच्या प्रामाणिकपणाचा, निष्ठेचा आणि विश्वासहर्तेचा अभिमान असल्याचं मत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले होते. डीडीसीए प्रकरणाची चौकशी याआधीच झाली असून त्यात काहीह तथ्य आढळलेले नाही. पण केजरीवाल भ्रष्ट अधिका-यांबाबत बोलण्याऐवजी जेटली यांना लक्ष्य करत आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली.