निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून काँग्रेसची संसद भवनात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:36 AM2019-11-23T02:36:38+5:302019-11-23T02:37:04+5:30
केंद्राकडून खोटारडेपणाचा कळस; मोदींनी मौन सोडण्याची मागणी
नवी दिल्ली : निवडणूक रोख्यांच्या व्यवहाराबाबत केंद्र सरकार वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप करून काँग्रेसनेसंसद भवनाच्या आवारात शुक्रवारी निदर्शने केली. निवडणूक रोख्यांच्या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन आता सोडावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी, आनंद शर्मा, शशी थरूर, मनीष तिवारी आदी काँग्रेस नेते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. निवडणूक रोख्यांबाबत रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगाने काही आक्षेप घेतलेले असतानाही त्याकडे केंद्र सरकारने कानाडोळा केला, अशा आशयाच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. तो मुद्दा काँग्रेसने उचलून धरत लोकसभा, राज्यसभेमध्ये केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.
व्यवहार पारदर्शक असल्याचा भाजपचा दावा
निवडणूक रोख्यांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असल्याचा दावा भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी गुुरुवारी केला होता. याआधी राजकीय पक्षांना रोख स्वरूपात देणग्या स्वीकारण्याची मुभा होती. आता निवडणूक रोख्यांचे व्यवहार राजकीय पक्षांच्या बँक खात्यांशी जोडलेले असतात. एसबीआय व तिच्या शाखांना निवडणूक रोख्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे घोटाळा होण्याची जराही शक्यता नाही, असेही पीयूष गोयल म्हणाले; पण हा दावा काँग्रेसला मान्य नाही.