दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगरमधील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये शनिवारी झालेल्या दुर्घटनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी रिषदेच्या कार्यकर्त्यांनी महापौर शैली ओबेरॉय यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या निदर्शनामुळे शेली ओबेरॉयच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता. यातच, सोसायटीच्या गेटबाहेर असलेल्या शेली ओबेरॉय यांच्या बोर्डवरही काळा रंग लावण्यात आला आहे.
अभावीपचे विद्यार्थी एमसीडीविरोधात महापौरांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनासाठी जमले असून एमसीडीच्या दुर्लक्षामुळे हा सर्व प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ABVP च्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी येते मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ते AAP सीएम केजरीवाल आणि महापौर शेली ओबेरॉय यांच्या विरोधात घोषणा देत आहेत.
आतिशी यांनी दिले कडक कारवाईचे आदेश -कोचिंग सेंटरमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात दिल्ली सरकारने कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना तत्काळ मॅजिस्ट्रेट चौकशी सुरू करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच, ज्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जे दोषी आढळतील त्यांना सोडू नका, त्यांच्यावर प्राधान्याने कारवाई करा, असे आतिशी यांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं? -शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याची सूचना दिल्ली अग्निशमन दलाला मिळाली. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी भरले असून त्यात अनेक विद्यार्थी अडकल्याचे सांगण्यात आले. यानंतर अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम तातडीने घटनास्थळी पोहचली. तेथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.
कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्रेरी बनवण्यात आली होती. याठिकाणी बरेच विद्यार्थी अभ्यास करत होते. घटनेच्या वेळी 30 विद्यार्थी आत होते. यांपैकी 3 विद्यार्थी आत अडकले. रेस्क्यू ऑपरेशननंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, यात 2 विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश होता.