नवी दिल्ली : हरियाणाच्या फरिदाबाद येथील जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या दलित बालकांची ‘कुत्र्या’शी तुलना करणारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, या मागणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. तथापि, सिंग यांनी दलितविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप फेटाळून लावताना; काँग्रेस या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप सरकारने केला. केंद्र सरकार सिंग यांच्या पाठिशी उभे असल्याचे स्पष्ट संकेत त्यातून मिळाले आहे.‘जे विधान सिंग यांनी केलेलेच नाही त्या विधानासाठी त्यांना जबर आघात पोहोचविला जात आहे. राहुलजी अचानक जागे होतात आणि एखादा कार्यक्रम हाती घेतात. व्ही. के. सिंग यांनी अशाप्रकारचे कुठलेही वक्तव्य केलेले नाही,’ असे केंद्रीयमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी म्हटले आहे. व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळातून हटविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस खासदारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वात निदर्शने केल्यानंतर रुडी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते.काँग्रेसने लोकसभेत वेगळ्या पद्धतीने हा मुद्दा उपस्थित केला. गेल्या आठवड्यात आपण या मुद्यावर केलेले वक्तव्य कामकाजातून वगळण्यात आल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.‘आपण २ डिसेंबरला व्ही. के. सिंग यांच्याबद्दल केलेले वक्तव्य तुम्ही (लोकसभा अध्यक्ष) कामकाजात वगळले नव्हते. पण ते आता कामकाजाचा भाग नाही, अशी तक्रार खरगे यांनी शून्य प्रहरात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे केली. परंतु पूर्व नोटीस दिल्याशिवाय तुम्ही हा मुद्दा उपस्थित करू शकत नाही आणि वाक्य वगळल्याचे आपल्याला ठाऊक नाही, असे महाजन म्हणाल्या.
सिंग यांच्या बडतर्फीसाठी निदर्शने
By admin | Published: December 08, 2015 2:11 AM