नवी दिल्ली : देशभरात डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत असून पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, तेलंगणात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये चालू वर्षात आतापर्यंत डेंग्यूने २४ जणांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी या राज्यात १४ जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. पश्चिम बंंगालमध्ये डेंग्यूने कहर केला असून, चालू वर्षात डेंगूचे ५,६०० रुग्ण आढळून आले आहेत. गतवर्षी या राज्यात ८,१५६ रुग्ण आढळून आले होते. एएमआरआय हॉस्पिटलचे डॉ. देबाशिष साहा यांनी सांगितले की, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी साचलेले पाणी या रोगाला कारणीभूत ठरत आहे. उत्तर प्रदेशात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे. गतवर्षी ७३१ रुग्ण आढळून आले होते, तर यंदा राज्यात आतापर्यंत २,१७३ रुग्ण आढळले आहेत. गतवर्षी राज्यात ९ जणांचा या रोगाने मृत्यू झाला होता, तर यंदा आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.दक्षिण भारतात हैदराबादेत डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. आॅगस्टपर्यंत येथे सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर गतवर्षी या शहरात दोन जणांचा या रोगाने मृत्यू झाला होता. शहरात चालू वर्षात १३५ जणांना डेंग्यू झाला. गेल्या वर्षी शहरात ७८ जणांना डेंग्यू झाल्याची नोंद आहे.
देशभरात डेंग्यू; दिल्लीमध्ये चिकनगुनियाचे थैमान
By admin | Published: September 14, 2016 5:33 AM