नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,25,58,530 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,164 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 607 जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 436365 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्येडेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच ब्लड बँकेतही मोठी गर्दी झाली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यातील लोकांना डेंग्यूची लागण होत आहे. मथुरामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत सहा चिमुकल्यांसह 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाराणसीमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. डेंग्यूमुळे रुग्णांच्या प्लेटलेट्सं कमी होत आहेत. त्यामुळेच ब्लड बँकेत मोठी गर्दी होत आहे.
वाराणसीमध्ये 55 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर मथुरातील एका गावामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. डॉ. रचना गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची टीम ही रुग्णांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी करत आहे. सरकारी रुग्णालयात तर रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेन्शन वाढलं! देशात कोरोनाची तिसरी लाट?; फक्त 2 दिवसांत नव्या रुग्णांची संख्या झाली 'दुप्पट'
कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान टेन्शन वाढलं आहे. कारण फक्त दोन दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ही दुप्पट झाली आहे. मंगळवारी (24 ऑगस्ट) 25467 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र आज त्याच्या जवळपास दुप्पट नव्य़ा रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी (25 ऑगस्ट) 37593 नवे रुग्ण सापडले होते. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,33,725 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 3,17,88,440 हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.