नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. मात्र कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूचा हाहाकार पाहायला मिळत आहे. काही राज्यात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखं डेंग्यूही आपलं रुप आता बदलत आहे. रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान डेंग्यूचा नवा स्ट्रेन असल्याचं देखील म्हटलं जात आहे. डेंग्यू रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं आढळून येत असल्याने डॉक्टर हैराण झाले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये डेंग्यूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या तब्बल 291 वर पोहोचली आहे. कोरोनासारखा डेंग्यू व्हायरस देखील बदलत आहे. ज्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं नाहीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. लालघाटी परिसरात राहणाऱ्या रोहित कुमार यांना खूप ताप आला होता. एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी ब्लड रिपोर्टमध्ये प्लेटलेट्स 1.75 लाख होत्या. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी कमी झाल्या. पण नंतर प्लेटलेट्समध्ये घट झालीच नाही.
पॅथोलॉजिस्ट डॉ. अमित गोयल यांनी डेंग्यूचा हा पॅटर्न हैराण करणारा असल्याचं म्हटलं आहे. जास्त रुग्णांमध्ये तापासोबतच डेंग्यूची लक्षणं पाहायला मिळत आहेत. पण त्यांच्या प्लेटलेट्स नॉर्मल आहेत. कदाचित चांगली इम्युनिटी असल्याने प्लेटलेट्समध्ये घट होत नसावी पण हा संशोधनाचा विषय असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. तापामुळे 10 दिवसांत तब्बल 53 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 186 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जवळपास 45 चिमुकल्यांनी डेंग्यूमुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच ब्लड बँकेतही मोठी गर्दी झाली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यातील लोकांना डेंग्यूची लागण होत आहे. मथुरामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शेकडो लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाराणसीमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. डेंग्यूमुळे रुग्णांच्या प्लेटलेट्सं कमी होत आहेत. त्यामुळेच ब्लड बँकेत मोठी गर्दी होत आहे. वाराणसीमध्ये 55 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.