नवी दिल्ली : एअरसेल - मॅक्सिस व्यवहार प्रकरणी मारन बंधूंच्या सुटकेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दयानिधी मारन आणि कलानिधी मारन यांची जप्त केलेली संपत्ती सोडण्यात येऊ नये, अशी मागणी ईडीने याचिकेद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आता बुधवारी सुनावणी होणार आहे. ईडीच्या वतीने बाजू मांडताना आनंद ग्रोव्हर यांनी स्पष्ट केले की, मारन बंधूंची सुटका करताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने योग्य प्रक्रिया अवलंबिली नाही. मारन बंधूंची जप्त केलेली संपत्ती सोडण्याबाबतही सांगण्यात आले आहे. हे आदेश चुकीचे असल्याचे मत ग्रोव्हर यांनी व्यक्त केले. मागील सरकारच्या काळात केंद्रात मंत्री असताना मारन यांनी मलेशियन व्यापारी टी. ए. आनंद कृष्णन यांना मदत केल्याचा आरोप होता.आनंद कृष्णन यांनी हजर राहावे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मलेशियातील मेक्सिस समूहाचे टी. ए. आनंद कृष्णन आणि आर. मार्शल यांनी येथे हजर रहायला हवे. मॅक्सिस प्रकरणात त्यांच्याविरुद्ध समन्स आहेत. जर ते न्यायालयात हजर झाले नाहीत आणि यावर प्रतिक्रिया दिली नाही तर आर्थिक नुकसानीबाबत त्यांना आक्षेप घेता येणार नाही. जर मलेशियन व्यावसायिकाने यावर उत्तर दिले नाही तर, वीस हजार कोेटी रुपयांच्या वसुलीसाठी एअरटेल- मॅक्सिसशी संबंधित स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मारन बंधूंच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार
By admin | Published: February 04, 2017 12:58 AM