नवी दिल्ली : आई होण्यासाठी मृत पतीचे वीर्य देण्याची मागणी एका विधवेने एम्स रुग्णालयाकडे केली होती; मात्र कायद्यात तरतूद नसल्यामुळे एम्सने मृताचे वीर्य काढण्यास नकार दिला. मृत पतीपासून गरोदर राहण्याच्या सुनेच्या इच्छेला मृताच्या आई-वडिलांचाही पाठिंबा होता; मात्र शवविच्छेदनावेळी वीर्य काढण्याबाबत (पोस्टमार्टेम स्पर्म रिट्रायव्हल- पीएमएसआर) देशात कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे ‘एम्स’च्या डॉक्टरांनी हतबलता दर्शविली.
मृत्यूपश्चात वीर्य काढून ते जतन करणे आणि लोकांसाठी त्याचा वापर करण्याच्या प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असण्याची नितांत गरज आहे, असे एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले. एम्सच्या सहायक न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, मृत्यूनंतर शुक्रजंतू अंडाशयात जवळपास एक दिवस सुस्थितीत राहू शकतात.
अंडाशयातील वीर्य काढण्याची प्रक्रियाही सुलभ आहे. वीर्योत्पादक ग्रंथींचे विच्छेदन करून वीर्य काढण्यात येते. केवळ पाच मिनिटांत ही प्रक्रिया होते; मात्र यात नैतिक आणि कायद्याचे मुद्दे अंतर्भुत आहेत. त्यामुळे तसे करता येत नाही, असे गुप्ता म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) रुग्णालये मृत पतीच्या वीर्यापासून महिलेची गर्भधारणा घडवून आणू शकतात; परंतु त्यासाठीचे वीर्य पती जिवंत आणि तंदुरुस्त असताना घेतलेले असावे, असे मार्गदर्शक तत्त्वात स्पष्टपणे नमूद आहे. मेडिकल इथिक्स या नियतकालिकात २००६ मध्ये प्रकाशित एका लेखात सहायक न्यायवैद्यक तज्ज्ञ राजेश बर्दाळे आणि पी.जी. दीक्षित यांनी पीआरएसएमची मागणी वाढू शकते, असे भाकीत केले होते; मात्र याबाबत निर्णय घेणे विकसित देशांपेक्षा भारतात अधिक गुंतागुंतीचे ठरेल, असेही त्यांनी या लेखात स्पष्ट केले होते.