थिरुवनंतपुरम : पश्चिम आशियात गेलेले केरळातील १५ तरुण बेपत्ता झाले असून ते इस्लामिक स्टेट (आयएस) या खतरनाक अतिरेकी संघटनेत सहभागी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. याची चौकशी करण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिले आहेत. केरळातील कासरगोड आणि पलक्कड जिल्ह्यातील हे तरुण आहेत. ते धार्मिक शिक्षणासाठी पश्चिम आशियात गेले होते. हे सर्वजण ३0 वर्षांच्या आतील असून, उच्च शिक्षित आहेत. काही जण डॉक्टर आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतित झाले आहेत. त्यांना कट्टरपंथी बनवून आयएसमध्ये भरती करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी एका खासदारासह काही स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना शोधण्यास मदत करण्याची विनंती केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुख्यमंत्री विजयन यांनी कोची येथे पत्रकारांना सांगितले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी करण्यात येईल. राज्याचे महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन यांनी कासरगोड येथे सांगितले की, हे तरूण आयएसच्या जाळ््यात अडकून त्यांच्या प्रदेशात गेले असतील, तर ही बाब खूपच कठीण होऊन बसेल. त्यामुळे त्यादृष्टीने तपास केला जाईल. तत्पूर्वी, कासरगोडचे खासदार पी. करुणाकरण यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. कासरगोडचे जिल्हा परिषदेचे सदस्य व्ही. पी. पी. मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बेपत्ता तरुणांकडून त्यांच्या पालकांना ईदनिमित्त एक व्हॉटस्अॅप संदेश आला होता. त्यात म्हटले होते की, आम्ही परत येणार नाही. येथे दैवी कायदा आहे. तुम्हीसुद्धा आम्हाला सामील व्हायला हवे. अन्य एका संदेशात म्हटले होते की, मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी आम्ही आयएसमध्ये सहभागी झालो आहोत. या संदेशांची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे, असे मुस्तफा म्हणाले. या तरुणांच्या कुटुंबियांनी खा. करुणाकरण, तिकारीप्पूरचे आमदार एम. राजगोपालन आणि मुस्तफा यांच्याशी संपर्क केला होता. (वृत्तसंस्था)
‘ब्रेक्झिट’वर पुन्हा सार्वमत घेण्यास नकार
By admin | Published: July 10, 2016 1:45 AM