लखनौ :उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसमुळे एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडेमात्र काही लोक अजब तर्क लावत वाट्टेल ती बडबड करताना दिसत आहेत. येथील देवबंदच्या उलेमांनी, कोरोनासंदर्भात प्रतिक्रिया देताना, 'अल्लाह नाराज आहे. म्हणून कोरोना व्हायरस परसवत आहे. लोकांनी अल्लाहला माणने सोडले अथवा आपलेच नियम कायदे सुरू केले आहेत. म्हणून अल्लाह नाराज आहे, असे तर्कट केले आहे.
सहारनपूरपासून साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवबंदच्या देवबंदी उलेमांनी, असा अजब तर्क दिला आहे. उलेमांनी म्हटले आहे, की डॉक्टर्सच्या सल्ल्याबरोबरच अल्लाहची प्रार्थनाही करा. देवबंदचे उलेमा कारी इशहाक गौरा यांच्यानुसार, 'नमाज पठन' करण्यापूर्वी आणि 'दस्तरखान'वर (जेवनाच्या ताटावर) जाण्यापूर्वी हात धुण्याचे जे नियम सांगण्यात आले आहेत, ते पाळले तर कोरोनाला रोखता येऊ शकते.
उत्तर प्रदेशातात सर्व शाळा आणि महाविद्यालये 2 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र देवबंदच्या दारूल उलूममध्ये मात्र सुट्टी नसणार आहे. दारूल उलूमने प्रशासनाचा हा आदेश मानायला नकार दिला आहे. त्यांनी परीक्षा झाल्यानंतर सुट्टी देणार असल्याचे म्हटले आहे.
दारूल उलूम प्रशासनाने मदशांमध्ये स्वच्छतेसोबतच हात सॅनिटाइज करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दारूल उलूमचे मुफ्ती अबुल कासमी नोमानी यांनी विद्यार्थ्यांना 10 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर ताबडतोब आपापल्या घरी ज्याण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशात मंगळवारपर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले 15 जण आढळून आले आहेत.