नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्धाचा वरातीत डान्सरसोबत नाचतानाचा आणि स्टंट करताना खाली पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नाचणाऱ्या व्यक्तीचा खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मृताचा भाऊ प्रमोद गिरी यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि घटनेला दुजोरा दिला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरिया जिल्ह्यातील भटनी येथील चंदौली गावातून 11 जून रोजी मानसिंग यांच्या मुलाची वरात भाटपारराणीच्या बंगरा बाजार येथे गेली होती. येथे एकीकडे द्वारपूजा चालू होती तर दुसरीकडे काही लोक नाश्ता करण्यात मग्न होते, तर दारातच काही तरुण आणि इतर वरातीतील लोक ऑर्केस्ट्रामध्ये नाचत होते. यादरम्यान पिकअप गाडीवर चढले आणि डान्सरसोबत डान्स करू लागले.
राम निवास गिरी हे नाचता नाचता गाडीच्या छताला असलेल्या लोखंडी रॉडला लटकून स्टंट करू लागले. त्यानंतर अचानक त्यांचा हात सुटला आणि ते जमिनीवर कोसळले. मंडपात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर राम निवास गिरी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
मृत राम निवास गिरी हे अविवाहित होते आणि आपल्या लहान भावाच्या कुटुंबासह गावात राहात होते. या प्रकरणी भटनीचे अधिकारी संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचताना पडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मात्र कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यात ही संपूर्ण घटना दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.