वडील-मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये समोर आली आहे. आपल्या वडिलांना कागदावर मृत दाखवून मुलांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. वडिलांना याची माहिती मिळताच ते एसडीएमकडे तक्रार घेऊन गेले. मात्र त्यांचं कुठेही ऐकलं जात नसल्याचं म्हणणे आहे. न्याय मिळावा म्हणून ते सर्वत्र फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिश्चंद यादव हे अहलादपूर मरकडी गावचे रहिवासी आहेत. त्यांना विजय यादव, मनोज यादव आणि अमित यादव अशी तीन मुलं आहेत. यापैकी अमितचा मृत्यू झाला आहे. हरिश्चंद यांनी पत्नी पानमतीच्या नावे जमीन खरेदी केली होती. त्यांनी एक इंटर कॉलेज देखील बांधलं, ज्याचे ते स्वतः व्यवस्थापक होते आणि नंतर त्यांनी आपल्या मुलाला व्यवस्थापक केलं.
हरिश्चंद यांच्या मालमत्तेची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. हरिश्चंद यांच्या पत्नी पानमती यांचे जून 2023 मध्ये निधन झाले. यानंतर त्यांची दोन मुलं मनोज यादव आणि विजय यादव यांनी कागदोपत्री फेरफार करून संपूर्ण जमिनीचा वारसा त्यांच्या नावे करून घेतला. त्यांचं नाव काढून टाकून कै. हरिश्चंद्र यादव असं लिहिलं असून सर्व मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे.
हरिश्चंद यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना धक्का बसला. ते म्हणतात की, त्यांची मुलं कधीही त्यांना मारू शकतात. त्यांचं एक इंटर कॉलेज आहे, ज्यामध्ये त्यांच्या मुलाला मॅनेजर बनवण्यात आलं. आता मी तिथे गेलो तर मला पोलिसांच्या ताब्यात देईन, अशी धमकी देत आहेत. त्यांनी रुद्रपूर तहसीलमधील एसडीएमची भेट घेतली असता त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही.
हरिश्चंद यादव यांनी सांगितलं की, मी सर्व मालमत्ता माझ्या पत्नीच्या नावावर खरेदी केली होती. 2023 मध्ये पत्नीचा मृत्यू झाला. आता षड्यंत्राचा एक भाग म्हणून पुत्रांनी सर्व संपत्ती आपल्या नावावर केली आहे. पेपरमध्ये आम्हाला मृत दाखवण्यात आले आहे. मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझा मुलगा मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. तसेच सर्व कागदपत्रांवर मला मृत दाखवण्यात आलं आहे.