नवी दिल्ली - नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. काही वर्षांपूर्वी राजकीय पटलावर उदय झालेल्या आम आदमी पक्षाने शानदार कामगिरी करताना तिसऱ्यांदा राजधानी दिल्लीवर आपला झेंडा फडकवला आहे. या पराभवात भाजपला काही प्रमाणात का होईना फायदा झाला. त्याचवेळी काँग्रेसला पुन्हा एकदा खातंही उघडता आले नाही.
2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला खातंही उघडता आले नव्हते. यावेळी एक तरी जागा काँग्रेस जिंकेल अशी शक्यता होती. मात्र काँग्रेसच्या 66 पैकी 63 उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. अनेक वर्षे दिल्लीत सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसची अवस्था या निवडणुकीत फारच वाईट झाली होती.
काँग्रेस नेत्यांच्या दाव्यानुसार दिल्लीत काँग्रेसचे सात लाखांहून अधिक सदस्य आहेत. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला निवडणुकीत केवळ साडेतीन लाख मते मिळाली आहेत. ही मत फारच नगण्य असून काँग्रेस नेतृत्वाला यावर तोडगा काढावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि 'आप'ला भाजपविरुद्ध दिल्लीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विधानसभेत 'आप'ने मुसंडी मारली. मात्र काँग्रेसला अद्याप उभारी घेता आलेली नाही.
दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला आठ ठिकाणी विजय मिळाला. 2015 मध्ये भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यामध्ये पाच जागांची भर पडली आहे.