४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये ३४,८०० कोटी रुपये जमा केले; राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 02:30 AM2020-05-17T02:30:00+5:302020-05-17T06:52:41+5:30
लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी सुमारे ४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३४,८०० कोटी रुपये जमा केले आहेत.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : लोकांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागणीला भाजपने उत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, काँग्रेस सरकारांनी जे मागील ७० वर्षांत केले नाही, ते मोदी सरकारने मागील ६ वर्षांत करून दाखवले आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी सुमारे ४० कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून ३४,८०० कोटी रुपये जमा केले आहेत.
भाजपचे राष्टÑीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, आर्थिक वादळ रोखण्यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची त्सुनामी होती. मोदी सरकारने भ्रष्टाचाराची सफाई केली आहे. तेव्हा १ रुपयामधील केवळ १५ पैसेच गरिबांच्या हातात पोहोचत होते व ८५ पैसे मधले लोक खात होते, अशी तेव्हा स्थिती होती. आता मात्र थेट लोकांच्या खिशात पैसा पोहोचत आहे.
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी व श्रमिकांच्या रोजगारासाठी २० लाख कोटी रुपयांची व्यवस्था करताना एमएसएमई, निर्माण क्षेत्रापासून ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत पैसे पोहोचवले आहेत.
गरीब कुटुंबांना ३ सिलिंडर पोहोचवण्यात आले आहेत व तीन महिन्यांचे रेशन मोफत देण्यात आले आहे. याबरोबरच दोन महिन्यांचे रेशन आणखी देण्याचीही तयारी सुरू आहे.
२०.०५ कोटी गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये १०,०२५ कोटी रुपये जमा केले. याचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. ३ कोटी विधवा, वृद्ध व दिव्यांकांच्या खात्यांमध्ये १४०५ कोटी रुपये थेट जमा करण्यात आले.
८.१९ कोटी शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेंतर्गत थेट १६.३९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. निर्माण श्रमिकांच्या खात्यांमध्येही ३४९३ कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचा लाभ २.५ कोटी लोकांना झाला.
४५ लाख खाजगी क्षेत्रातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. अशा प्रकारे ३९.२८ कोटी लोकांच्या खात्यांमध्ये ३४,८०० कोटी रुपये जमा करण्यात आले.