पटना : बिहारच्या अनेक भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे 29 लोकांचा मृत्यू झाला असून राजधानी पटनामधील 80 टक्के घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. प्रशासनाने मंगळवारपर्यंत शाळा, कॉलेजांना सुटी जाहीर केली आहे.
राज्य सरकारने रेस्क्यू ऑपरेशनसाठी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर मागितले आहेत. तर हवामान विभागाने आजच्या दिवशीही जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. बिहारमध्ये सरासरीच्या 40 टक्के पाऊस गेल्या 48 तासांत झाला आहे. पटनाच्या जवळच्या सोन, गंगा, गंडक आणि पूनपून या चारही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी हे देखिल पुराच्या पाण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून अडकले होते. त्यांना आज रेस्क्यू करण्यात आले. शुक्रवारी रात्रीपासून ते अडकले होते. दोन हेलिकॉप्टर मदतीसाठी पोहोचली असून 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.