बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. अपहरण प्रकरणीतील आरोपी शिव शक्ती कुमार यांनी नात्याने त्यांची पुतणी लागणाऱ्या सजल सिंधू नावाच्या तरुणीसोबत विवाह केल्याचे उघड झाले आहे. या दोघांनीही खगडिया येथील कात्यायानी मंदिरात जाऊन लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर नवदाम्पत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधून या दाम्पत्याने आपलं म्हणणं समोर मांडलं आहे. आम्ही विवाह केला असून, अपहरणाबाबत दाखल करण्यात आलेली एफआयआर पूर्णपणे खोटी आहे, असं त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे.
दरम्यान, सजल सिंधू हिने हा व्हिडीओ मानवाधिकार आयोग, बार कौन्सिल आणि सरन्यायाधीशांना मेल केला आहे. तर शिव शक्ती कुमार यांनी आपल्या जीवितास धोका अससल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र हे दोघेही अद्याप सर्वांसमोर आलेले नाहीत. शिव शक्ती कुमार हे त्यांच्या बेगुसरायमधील कार्यालयात पोहोचलेले नाहीत. तसेच ते घरीही गेलेले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य खगडिया येथे एका गुप्त ठिकाणी राहत आहे. शिव शक्ती कुमार यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, जर तुम्ही प्रेम करत असाल तर तुमचं प्रेमाप्रति समर्पण असलं पाहिजे. आर्थिक मोह आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या आहारी जाता कामा नये. आम्ही प्रेमाप्रति समर्पण दाखवलं आहे.
ते पुढे म्हणाले की, आमच्याविरोधात वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर सदर पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अपहरण किंवा इतर कुठलंही अनैतिक काम केलेलं नाही. आम्ही प्रेमविवाह केला आहे. आता आमच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रशासनाने सुरक्षा पुरवावी. नैतिकतेच्या नावाखाली लोकांच्या हिंसक होण्यामुळे आम्ही स्वत:ला असुरक्षित समजत आहोत, असेही त्यांनी सांगितले.