नवी दिल्ली : हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी व एका कार्यकर्त्यासोबत शनिवारी कुलगाममध्ये अटक करण्यात आलेले पोलीस उपअधीक्षक दविंदरसिंग यांनी या दहशतवाद्यांकडून १२ लाख रुपये मिळाल्याचे चौकशीमध्ये कबूल केले.
या दहशतवाद्यांना सिंग हे आधी जम्मूला आणि तेथून दिल्लीला जाण्यासाठी चंदीगडला नेणार होते. ही माहिती महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी सोमवारी सांगितली. या दहशतवाद्यांचा प्रजासत्ताकदिनी हल्ला करण्याचा कट होता. दविंदरसिंग यांना सोमवारी निलंबित करण्यात आले असून, अतिरेकीविरोधी कारवायांसाठी दिले गेलेल्या राष्ट्रपती पदकासह त्यांचे सगळे पुरस्कार काढून घेण्यात आले आहेत. गुप्तचर विभाग, लष्करी गुप्तचर खाते, रॉ आणि पोलिसांनी दविंदरसिंग यांची चौकशी केली आहे.
नावीद बाबू ऊर्फ बाबर आझम (रा. नाझनीनपुरा, दक्षिण काश्मीर, जिल्हा शोपियान) आणि रफी अहमद राथेर या दहशतवाद्यांना तसेच हिज्बुल मुजाहिदीनचा कार्यकर्ता इरफान शफी मीर यांची कार शनिवारी पोलिसांनी अडवली होती. इरफान मीर हा त्याच्या पासपोर्टवर पाच वेळा पाकिस्तानला गेला होता. केंद्र सरकारच्या निमंत्रणावरून गेल्या आठवड्यात युरोपियन देशांच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. या शिष्टमंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी दविंदरसिंग यांच्याकडे होती.दहशतवाद्यांना घरी ठेवल्याचे केले कबूलश्रीनगरमधील इंदिरानगर येथे घरी या दहशतवाद्यांना ठेवल्याचे सिंग यांनी कबूल केले. सिंग यांचे घर लष्कराच्या १५ कॉर्प्स मुख्यालयाशेजारी आहे. हिज्बुलच्या कार्यकर्त्याने मारुती कार चालवली होती. या कारमधून सिंग यांनी त्या दोन दहशतवाद्यांना जम्मूत आणले होते, अशी गुप्तचरांची माहिती आहे.