चंदीगड : पंजाब निवडणुकीपूर्वी संचित रजेवर (फर्लो) आलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला झेड प्लस ( Z+) सुरक्षा देण्यात आली आहे. हरयाणा सरकारने खलिस्तान्यांपासून गुरमीत राम रहीमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा वाढवली आहे. सरकारने एडीजीपी (CID) यांचा अहवाल सुरक्षेचा आधार बनवला आहे. खलिस्तान समर्थक डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा देण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या संचित रजेवर आहे. निवडणुकीपूर्वी मिळालेल्या संचित रजेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत हरयाणा सरकारला घेरले होते. दरम्यान, सिरसा मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे पंजाब आणि उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. मात्र, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, गुरमीत राम रहीमला फर्लो मंजूर करण्याचा कोणत्याही निवडणुकीशी काहीही संबंध नाही. बॉलीवूड अभिनेता माही गिल आणि पंजाबी अभिनेता हॉबी धालीवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या वर्षीही डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपत्कालीन पॅरोल मंजूर करण्यात आला होता. प्रकृतीचे कारण सांगून तो काही वेळा तुरुंगातून बाहेरही आला होता. दरम्यान, गुरमीत राम रहीम हा रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची आणि 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. सध्या गुरमीत राम रहीमला काही अटींसह 21 दिवसांची संचित रजा देण्यात आली आहे. यामध्ये तो जाहीर सभा घेऊ शकत नाही किंवा त्याच्या सिरसा डेरामध्ये भाविकांची गर्दी करू शकत नाही. यासोबतच तो परवानगी घेऊनच शहराबाहेर जाऊ शकतो.
दरम्यान, गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 रोजी साध्वी बलात्कार प्रकरणी पंचकुला कोर्टात हजर करण्यात आले होते. विशेष सीबीआय न्यायालयाने त्याची सुनारिया तुरुंगात रवानगी केली होती. या प्रकरणी 27 ऑगस्ट रोजी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात सीबीआय कोर्टाची सुनावणी झाली, ज्यामध्ये गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लात्कार आणि हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमलाही दोषी ठरवण्यात आले होते. गुरमीत राम रहीम तेव्हापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे.