Gurmeet Ram Rahim Parole : बलात्कार आणि हत्या प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मंगळवारी राम रहीमला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आहे.
रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहीमला पुन्हा ३० दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. पॅरोल मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी साडे-पाच वाजता राम रहीमला तुरुंगातून बाहेर आला. कडक सुरक्षेत राम रहीमला सुनारिया तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. यानंतर राम रहीम हा सिरसा येथील आश्रमात पोहोचला आहे.
राम रहीम सिरसा येथील आश्रमात राहणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, शिक्षा सुनावल्यानंतर त्याला सिरसा डेरामध्ये राहण्याची परवानगी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१७ मध्ये शिक्षा सुनावल्यानंतर तो ८ वर्षे सिरसा डेरा मुख्यालयात जाऊ शकला नाही.
दरम्यान, २०१७ मध्ये पत्रकार हत्या आणि बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवण्यात आले होते. याप्रकरणी राम रहीम याला २० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. २०१७ पासून तुरुंगात असलेल्या राम रहीमला १२ वेळा पॅरोल मिळाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वारंवार पॅरोल मंजूर केल्याबद्दल अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.