पंचकुला/चंदीगड : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना बलात्काराच्या आरोपाबद्दल सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवताच पंजाब व हरयाणात त्याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक सुरू केली असून, त्यांनी २00 हून अधिक वाहने, अनेक रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकर कार्यालय, दूध प्रकल्प यांना आग लावली. दिल्लीत एका ट्रेनच्या बोगीही पेटवली. या हिंसाचारामुळे पोलीस व सुरक्षा दलांनी तिथे आधी लाठीमार, नंतर पाण्याचा मारा व अश्रुधूर सोडला. तरीही हा जमाव त्यांच्या अंगावर येत होता. त्यामुळे अखेर केलेल्या गोळीबारात ३0 जण ठार व २५0 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.दुपारी तीन वाजण्याच्या सुमारात राम रहीम दोषी असल्याचा निकाल न्या. जगदीप सिंग यांनी सुनावला असला तरी शिक्षा मात्र सोमवार, २८ आॅगस्ट रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावली जाईल. राम रहीमने २00२ साली साध्वींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या खटल्याचा निकाल १५ वर्षांनी लागला.पंजाब व हरयाणाच्या सर्व शहरांतून हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीच्या घटनांच्या बातम्या येत असल्या तरी सर्वाधिक नुकसान पंचकुला व चंदीगडमध्ये झाले आहे. तिथे पोलीस तसेच सशस्त्र सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय असलेल्या सिरसामध्ये लष्कराने संध्याकाळी ध्वजसंचलन केले. तिथे सरकारी दूध प्रक्रिया प्रकल्पही जमावाने पेटवला.
सोनिया-अमरिंदर सिंग चर्चाकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि राज्यात शांतता व सुव्यवस्था राखा असे आवाहन त्यांना केले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंजाब मंत्रिमंडळाची तातडीची बैठक शनिवारी सकाळी होणार आहे.गृहमंत्री लगेच परतलेकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग क्रिगिजस्तानच्या दौºयावर होते. तणावाची माहिती मिळताच ते तेथून तीन तास लवकर निघून दिल्लीस परतले. येताच त्यांनी पंजाब व हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि नंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ न त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.राष्ट्रपतींना दु:खराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच सर्वांना शांततेचे आवाहनही त्यांनी केले आहे.लष्कर राहणारराम रहीम यांची नेमकी शिक्षा सोमवारी जाहीर होईल. त्यावेळीही हिंसाचार होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्याच्या अखेरीपर्यंत सर्व संबंधित राज्यांना व तेथील पोलीस दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षा प्रत्यक्ष जाहीर होऊ न सारे शांत होईपर्यंत चंदीगड, पंचकुला तसेच सिरसा येथे लष्कर राहणार आहे.भटिंडा, मलौत, बलुआना आदी रेल्वे स्थानके, एक वीजपुरवठा केंद्र, एक टेलिफोन एक्स्चेंज, प्राप्तिकरसह अनेक सरकारी कार्यालये आणि ५00 हून अधिक वाहने जाळण्यात आल्याचे वृत्त आहे.सामूहिक गुंडगिरी असेच वर्णनया समर्थकांनी पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांवरही जोरदार दगडफेक केली, लाठ्यांनी पोलिसांवरही हल्ले चढवले व वाहने फोडायला, जाळायला सुरुवात केली. या प्रकाराचे वर्णन भक्तांची सामूहिक गुंडगिरी असे केले जात आहे.हे समर्थक कोणताही गोंधळ करणार नाहीत, ते शांतताप्रिय आहेत, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सांगत होते. प्रत्यक्षात मात्र गुंडगिरीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.दिल्लीतही जाळपोळ सुरू झाली असून, तिथे रेल्वेचा डबा तसेच एक बस जाळण्यात आली. आणि हिमाचल प्रदेशातून हिंसाचाराच्या बातम्या आल्या आहेत.उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्येही हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. राम रहीमच्या समर्थकांनी टीव्ही चॅनलच्या अनेक ओबी व्हॅन फोडल्या, काही पेटवून दिल्या आणि अनेक पत्रकार व ओबी व्हॅनवरील कर्मचाºयांनाही प्रचंड मारहाण केली.मालमत्ता जप्त करा : कोर्टएवढ्या प्रचंड नुकसानाची भरपाई बाबा राम रहीमची मालमत्ता जप्त करून वसूल करा, असे आदेश पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी त्याच्या सर्व मालमत्ता व संपत्तीची माहिती न्यायालयाने सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे राम रहीमचा सिरसा येथील आश्रम असलेला शेकडो एकरचा भाग जप्त केला जाईल, असे सांगण्यात येते. खासगी मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई राज्य सरकार करेल, असे हरयाणा सरकारने जाहीर केले आहे.