नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या समारंभाला उपस्थित राहण्याची आणि बाबूजींच्या ‘प्रेरणा स्थळा’ला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी बुधवारी राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना ‘प्रेरणा स्थळ’ हे पुस्तक भेट दिले, त्यावेळी राष्ट्रपतींनी आपली ही इच्छा व्यक्त केली.यावेळी बाबूजींबद्दलच्या आपल्या जुन्या स्मृतींना उजाळा देताना राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, ‘ते माझे सहकारी आणि मित्र होते.’ १९५८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि विनोबा भावे हे यवतमाळला आले होते. त्यावेळी बाबूजींनी विज्ञान महाविद्यालय उघडले होते. त्यावर भाष्य करताना नेहरू म्हणाले होते की, ‘एका भूमिहीन, मागासलेल्या आणि आदिवासी क्षेत्रात विज्ञान महाविद्यालय उघडण्याचा कुणी विचार तरी कसा करू शकतो? ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे. खरे सांगायचे झाले तर याच विचाराला सलाम करण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. एक दिवस हे महाविद्यालय विद्यापीठाचे सर्वांत मोठे महाविद्यालय बनेल. जेथे गरीब विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करू शकतील.’ त्यावेळी अमोलकचंद कॉलेजमध्ये विज्ञान विषयाचे केवळ ४० विद्यार्थी होते. पं. नेहरूंचे म्हणणे आता खरे झाले आहे. या कॉलेजमध्ये आज ३००० विद्यार्थी शिकत आहेत आणि स्वस्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करीत आहेत. ‘मला आठवते, ज्या दिवशी माझी राष्ट्रपतिपदासाठी निवड झाली होती, त्याच दिवशी तुमच्या पूज्य मातोश्री वीणादेवी यांचे निधन झाले होते; परंतु तरीदेखील तुम्ही माझ्यासाठी मतदानाला आला होतात,’ असे राष्ट्रपती मुखर्जी यांनी या चर्चेदरम्यान खासदार विजय दर्डा यांना सांगितले, तेव्हा तेथे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रपती मुखर्जी यांचा यवतमाळ दौरा निश्चित झाला, तर तेथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, यवतमाळला भेट देणारे ते तिसरे राष्ट्रपती असतील. याआधी माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी खासदार विजय दर्डा यांच्या आमंत्रणावरून यवतमाळला भेट दिलेली होती. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार विजय दर्डा यांनी या भेटीदरम्यान सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या भजनांचा संग्रह असलेली सीडी भेट दिली, त्यावेळी राष्ट्रपती मुखर्जी अत्यंत भावुक झाले. या सीडीमध्ये ज्योत्स्ना दर्डाद्वारा रचित भजनांचा संग्रह आहे आणि त्यांना साधना सरगम, वैशाली सामंत, सुरेश वाडकर आणि रुची यांच्यासारख्या गायकांनी आपला स्वर दिला आहे.भजनांची ही सीडी हाती घेताना मुखर्जी यांनी ज्योत्स्ना दर्डा यांच्याशी झालेल्या आपल्या भेटीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘ज्योत्स्नाजींना मी अनेकदा भेटलो आहे. त्यांच्या अंगी कमालीचा साधेपणा वसत होता. त्या कायम हसतमुख राहत असत. ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास ओळख होती. त्या सुगरण होत्या. त्यांच्या हातच्या जेवणाची चव मी चाखलेली आहे.’खासदार विजय दर्डा यांनी जेव्हा बाबूजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणा स्थळा’बाबत विस्तृत माहिती दिली तेव्हा राष्ट्रपती मुखर्जी औत्सुक्यापोटी म्हणाले, ‘मी हे प्रेरणा स्थळ बघायला अवश्य येऊ इच्छितो.’ तथापि राष्ट्रपतींचे प्रेरणास्थळी येणे हे त्यांच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमांवरच अवलंबून राहील. (प्रतिनिधी)
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची ‘प्रेरणा स्थळा’ला भेट देण्याची इच्छा
By admin | Published: July 31, 2015 1:52 AM